नागपूर 'एम्स'चे मेडिकल कॉलेजसोबत प्रत्यक्ष काम सुरू
मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी पाहिले लेक्चर ‘AI and Brain Computer’ संपन्न
पाठपुराव्याला यश : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
नागपुरच्या प्रख्यात 'एम्स' अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे धाराशिवच्या शासकीय मेडिकल कॉलेजसोबत प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या निर्णया नुसार शुक्रवारी धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम्सच्या तंज्ञांकडून पाहिले ऑनलाईन व्याख्यान देण्यात आले. 'एम्स' आणि धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयातील अभूतपूर्व अशा ऐतिहासिक सहकार्यास या व्यख्यानाच्या माध्यमातून प्रारंभ झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव मेडिकल कॉलेज आणि नागपूर एम्स यांच्यातील झालेल्या निर्णयानुसार भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात नागपूर 'एम्स'च्या महत्वपूर्ण सहकार्याचा पहिला टप्पा शुक्रवारी प्रत्यक्षात आला. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेंदू-संगणक’ या विषयावर एम्सचे डॉ. प्रथमेश कांबळे यांचे पहिले ऑनलाइन व्याख्यान शुक्रवारी पार पडले. या ऐतिहासिक टप्प्यामुळे विद्यार्थ्यांना 'एम्स'सारख्या नावाजलेल्या संस्थेतील मान्यवर तज्ञांकडून मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. तसेच या महत्वपूर्ण ज्ञानाचा जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी महत्वाचा लाभ होणार आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दूरदर्शी प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानास उपस्थित राहून मान्यवर तज्ञ आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थी बांधवांनी या महत्वपूर्ण सामंजस्य कराराबद्दल समाधान व्यक्त केले.
एम्सचे डॉ. प्रथमेश कांबळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेंदू-संगणक संवाद’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती प्रेझेंटेशनद्वारे सादर केले. बीसीआय तंत्रज्ञान आणि त्याचे अगदी साध्या सोप्या भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस (BCI) हे एक तंत्रज्ञान आहे जे मानवी मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करते. डॉ. कांबळे यांनी EEG आणि FNIRS चा वापर करून विचारण्यात आलेल्या भाषेचे व भावना ओळखण्याचे अत्याधुनिक संशोधन केले आहे. हे संशोधन बोलू न शकणाऱ्या किंवा हालचाल न करता येणाऱ्या रुग्णांसाठी संवादाचे एक नवे प्रभावी साधन ठरणार आहे. AI अर्थात कृत्रीम बुद्धिमत्ता आणि वैद्यकीय क्षेत्रातील भविष्य या अत्यंत उपयुक्त आणि महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने डॉ. कांबळे यांनी AI चा उपयोग डायबेटीस निदान, हार्टरेट व्हेरिएबिलिटी विश्लेषण, आणि स्मार्ट उपकरणे तयार करण्यात कसा केला जातो हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. भविष्यात मेंदू-ते-मेंदू संवाद (Brain-to-Brain Communication) शक्य होऊ शकतो, ज्यामुळे वैद्यकीय संवादात एक क्रांती घडणार आहे. एआय मुळे वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन युग सुरू होत आहे. मनामध्ये येणारे नकारात्मक विचार आणि नैराश्याच्या परिस्थितीमध्ये या तंत्रज्ञानाचा मोलाचा उपयोग करता येऊ शकतो. त्यामुळे मानवी जीवन अधिक ताणतणाव मुक्त होऊ शकते असेही डॉ. कांबळे यांनी यावेळी सांगितल्याचे आमदार पाटील म्हणाले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्रसिंह चौहान, डॉ. शफिक मुंडेवाडी, डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. पुष्पा अग्रवाल, डॉ. चेतन राजपूत, डॉ. महिंद्रकुमार धाबे, डॉ. सिद्धीकी, डॉ. चौरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.