खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा वेळेत पुरवठा करा*
*पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश*
*खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक*
*धाराशिव (साप्ताहिक संत गोरोबाकाका समाचार वृत्तसेवा)*
येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतीही पावसाच्या पाण्यावर केली जाते. बहुतांश शेतकरी हे कोरडवाहू पद्धतीने शेती करतात. शेतकऱ्यांना यावर्षी चांगले उत्पादन झाले पाहिजे, यासाठी सन 2025 च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करतांना अडचण जाणार नाही, याची दक्षता घेऊन कृषी निविष्ठांचा वेळेत पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले, येत्या खरीप हंगामात जिल्ह्यासाठी महाबीजच्या ज्या बियाण्यांची आवश्यकता आहे, त्याची मागणी आताच महाबीजच्या जिल्हा कार्यालयाने कृषी विभागाच्या समन्वयातून महाबीज अकोला यांच्याकडे करावी. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा. आपण स्वतःही त्यासाठी महाबीजच्या महाव्यवस्थापकांशी बोलणार आहोत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस खताच्या पुरवठा होणार नाही, याची दक्षता आतापासूनच घ्यावी. बोगस खतांची तपासणी करण्यात यावी. बोगस खत विक्री होत असल्याचे लक्षात आल्यास तातडीने संबंधित कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांना खत तपासणीसाठी किट उपलब्ध करून द्यावी, असेही श्री.सरनाईक यांनी सांगितले.
कृषी विभागाने जिल्ह्यातील पीक पद्धतीत बदल करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे सांगून खासदार श्री.राजेनिंबाळकर म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी अन्य पिकाकडे वळला पाहिजे, यासाठी केळी लागवडीसाठी प्रोत्साहित करावे, केळी पिकासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान याबाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून केळी लागवड फायद्याची असल्याचे त्यांनी सांगितले.
उमरगा-लोहारा तालुक्यात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे, पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याचे आमदार श्री.स्वामी यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.माने यांनी सन-2024 मध्ये झालेल्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्द्यांचा अनुपालन अहवाल यावेळी वाचून दाखवला. सन 2024-25 या वर्षात मनरेगा व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून 1641 हेक्टरवर फळबाग लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत 120 प्रकरणे मंजूर, 12 शेतबांधावर प्रयोगशाळांची निर्मिती, बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातून 30 हजार 432 मॅट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी व जनजागृतीमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे 3 लक्ष 65 हजार क्विंटल घरगुती बियाणे वापरण्याचे सांगितले.
यावेळी श्री.माने यांनी कृषी विभागातील महत्त्वाच्या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या व वितरित करण्यात आलेला निधी, 1998 ते 2024 मधील पर्जन्यमान, दहा वर्षात महसूल मंडळात झालेली तालुकानिहाय अतिवृष्टी, खरीप हंगामात सन 2025-26 मध्ये प्रस्तावित क्षेत्र उत्पादन व उत्पादकता, जिल्ह्यातील उसाखालील लागवड क्षेत्र, ऊस पिकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, बियाण्यांचे नियोजन, खरीप 2024 मध्ये शेतकऱ्यांनी राखून ठेवलेले सोयाबीन बियाणे, खरीप हंगामात 2025 मध्ये खताची मागणी व पुरवठा, मागील 5 खरीप हंगामात जिल्ह्यात केलेला खताचा वापर, या वर्षीसाठी रासयनिक खत मंजूर आवंटन, खताचा संरक्षित साठा, तक्रारींची दखल घेण्यासाठी भरारी पथके, जिल्ह्यात राबाविण्यात आलेले नाविण्यपूर्ण उपक्रम, मागील 5 वर्षात आंबा फळपिकाची अपेडा प्रणालीवर केलेली शेतकऱ्यांची नोंदणी, ॲग्रीस्टॅक योजनेतंर्गत शेतकऱ्यांची नोंदणी, विविध योजनांची वर्षनिहाय माहिती श्री.माने यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात श्री.माने यांच्या नेतृत्वात कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे काम करीत असल्याबद्दल श्री.सरनाईक व खासदार श्री.राजेनिंबाळकर यांनी त्यांचे कौतूक केले.