हजारो युवक स्वयंरोजगारातून बनले उद्योजक
इतरांनीही विविध योजनांचा लाभ घ्यावा : आमदार पाटील
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
जिल्ह्यातील हजारो युवक स्वयंरोजगारातून यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. त्या माध्यमातून शेकडो कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार लाभला आहे. समाजातील इतर गरजू घटकांनीही राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायला हवा. भविष्यातील मोठ्या संधी पदरात पाडून घेण्यासाठी युवक आणि युवतींनी नोकरीचा अनुभव गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्यामध्ये व्यवसायाची कौशल्य निर्माण होतील, जेणेकरून त्यातून आपले कुटुंबही आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना होतकरू तरुणांना सर्वतोपरी मदत करण्यास आपण तयार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी करण्यात आले होते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या उपक्रमामध्ये शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि नियोजन विभागाच्या ‘मित्र’संस्थेचे उपाध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनाक घोष, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, तहसीलदार श्री. अरविंद बोळंगे, जिल्हा कौशल्य विभाग सहाय्यक आयुक्त श्री. संजय गुरव, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी श्री. प्रवीण आवताडे, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजनकर, तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, माजी नगराध्यक्ष श्री. सचिन रोचकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यास दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, पदवीधर, तसेच अभियांत्रिकी, फार्मसी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज्यभरातील ३२ हून अधिक मान्यताप्राप्त कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला आणि या मेळाव्यातून ५६४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत या मेळाव्यात अनेक नामवंत उद्योजक व एचआर प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यानिमित्ताने रोजगाराच्या अनेक संधी युवकांसमोर खुल्या करून देण्यात आल्या. मोठ्या संख्येने उमेदवारांनी विविध नोकऱ्यांच्या संधीसाठी मुलाखती दिल्या. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यास मदत झाली असून भविष्यात असे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला..
चौकट
22 जुलै 2022 रोजी मा.देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमीत्त तेरणा पब्लीक चॅरीटेबल ट्रस्ट च्या सहकार्याने जिल्ह्यातील युवकांना रोजगार व स्वय रोजगार निर्मीतीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री / प्रधानमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम व इतर शासकीय योजनेच्या माध्यमातुन नवीन उद्योग सुरु करण्यासाठी अथवा चालु उद्योग वृध्दीगत करण्यासाठी प्रस्ताव बनविण्यापासुन कर्ज मंजुरी व उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला होता. या उपक्रमास जिल्हयात मोठे यश मिळाले असुन हजारो युवकांनी या माध्यामातुन लहान मोठे उद्योग सुरु करुन स्वत: उद्योजक बनुन इतरांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. या उपक्रमातील लाभार्थी उद्योजकांचा आज या निमीत्ताने सत्कार करण्यात आला.